पूरसदृश्य परिस्थितीमुळे साताऱ्यात 361 नागरिकांचे स्थलांतर; वाहतुकीसाठी अनेक रस्ते बंद
सातारा प्रतिनिधी:
सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसाने परिस्थिती गंभीर बनली आहे. कोयना, धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी आणि वीर या प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने 129 कुटुंबांतील 361 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नदीकाठच्या आणि पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित निवारा शेड, शाळा, हायस्कूल याठिकाणी तसेच नातेवाईकांकडे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. प्रत्येक तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.”
तालुकानिहाय स्थलांतरित नागरिकांची संख्या
-
पाटण तालुका
- पाटण शहर : 13 कुटुंबे, 45 नागरिक
- हेळवाक : 5 कुटुंबे, 17 नागरिक
- नावडी, औंध वस्ती : 7 कुटुंबे, 15 नागरिक
-
कराड तालुका
- कराड शहर, पत्राचाळ, पाटण कॉलनी, कोयना दूध कॉलनी, रुक्मिणीनगर : 6 कुटुंबे, 24 नागरिक
-
महाबळेश्वर तालुका
- येर्णे बु. : 8 कुटुंबे, 18 नागरिक
-
वाई तालुका
- वाई शहर : 40 कुटुंबे, 135 नागरिक
-
सातारा तालुका
- भैरवगड : 30 कुटुंबे, 65 नागरिक
- मोरेवाडी : 20 कुटुंबे, 42 नागरिक
वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम
पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. काही रस्त्यांवर पाणी ओसंडून वाहत असल्यामुळे पूल व रस्ते प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बंद केले आहेत.
- पाटण तालुका : नेरळे पूल, मुळगाव पूल, पाबळनपाला रस्ता खचल्याने बंद
- कराड तालुका : कराड–हेळवाक रस्ता पाण्याखाली
- महाबळेश्वर तालुका : देवसरे–मजरेवाडी रस्ता बंद
- वाई तालुका :
- कृष्णा नदीवरील हमदाबाज–किडगाव पूल
- करंज–म्हसवे पूल
- मौजे जिहे येथील जिहे–कठापूर रस्त्यावरील पूल पाण्याखाली
- खंडाळा तालुका :
- नीरा नदीवरील लोणंद (वाठार)–वीर रस्ता
- जून पाडेगाव रस्ता बंद
प्रशासनाने पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, नागरिकांनी गरजेअभावी प्रवास टाळावा, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
प्रशासन सज्ज, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले की, “पूरग्रस्त भागांमध्ये पथकं तैनात केली असून, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, आरोग्य व महसूल यंत्रणा सतत संपर्कात आहे. धरणांमधील पाणी सोडण्याची परिस्थिती पाहून आवश्यक ते निर्णय घेतले जातील.”
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करून त्यांनी सांगितले की, “नदीकाठच्या गावांतील रहिवाशांनी अनावश्यक धोकादायक ठिकाणी जाऊ नये. प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचना आणि इशारे पाळावेत. अफवा पसरवू नयेत.”
पुढील काही दिवस आव्हानात्मक
मौसम विभागाकडून कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अजून काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे धरणांवरील दबाव कायम राहणार असून, नदीकाठच्या गावांना सतत अलर्टवर राहावे लागणार आह.
Comments
Post a Comment